चमत्कार

बाबा हवेतून काढतात अंगारा... देतात भक्ताला गुंगारा

चमत्काराच्या भरी भरोनी, झाली अनेकांची धुळधाणी।
संत चमत्कार यापुढे ,नका वर्णू सज्जनहो कुणी।।
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी
असे स्पष्ट शब्दात सांगितले आहे तरी चमत्कार करणाऱ्याला लोकं मोठ्या संखेने,भक्तिभावाने नमस्कार करतात. सामान्य माणसाला या चमत्कारांचे मोठे आकर्षण व नवल असते.आज आपण एक चमत्कार व त्यामागील गुपितं त्याची वैज्ञानिक कारणमिमांसा समजून घेऊया.

हवेतून हात फिरवून विभूती - अंगारा,ताबीज,अंगठी,घड्याळ,लाडू प्रसाद,सोन्याची चैन काढून दैवी चमत्कार शक्तीचा आव आणणारे अनेक बुवाबाबा,देव्या,मांत्रिक,स्वामी संपूर्ण भारतभरात मोठ्या संख्येने आहेत. यामध्ये अनेक मंत्री,बडे अधिकारी,सुप्रसिद्ध खेळाडू,नटनट्यांना सोन्याची चैन देणारे पुट्टपुर्थीचे सत्यसाईबाबा,गुलाबबाबा इ. चमत्कारांसाठी सर्वदूर जनतेला परिचित आहेत. मग अश्या आश्रमात यांना देवाचा अवतार मानून उच्च शिक्षित (?) भक्त यांच्या पायाशी लोळण घेतात.

हवेतून वस्तू कशी काढतात ?
हे फार सोपं आहे त्यासाठी 
१) कुणालाही दिसणार नाही यापद्धतीने हाताचा अंगठा व पहिल्या बोटाच्या मध्ये विभूतीची गोळी (खडा) वस्तू लपून ठेवल्या जाते. 
२) लोकांसमोर हवेत हातवारे करून चलाखीने तिला दोन बोटांच्या चिमटीतून हातात घेतल्या जाते. मग अलगद फोडून बऱ्याच भक्तांना वाटली जाते. 
३) अनेकदा झब्याच्या बाहीत अश्या वस्तू ठेवल्या जातात. अश्या वेळी हात अंदाजे ९० अंशाच्या कोनात असतो. भक्त समोर आला की, हात खाली करून ती वस्तू  बाहीतून खाली सरकते, तळहातात घेत मग भक्तांना दिल्या जाते. महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री,खेळाडू आदी नामवंतांना सत्य साई बाबांनी अश्या प्रकारे सोन्याची चैन दिलेली आहे.


विभूतीची गोळी कशी तयार कराल ?

पूजेच्या साहित्याच्या दुकानात सुगंधित वस्त्रधार विभूतीचे पुडे मिळतात किंवा शेणाच्या गोवरीची राख तांदळाच्या पेज मध्ये हळूहळू भिजवून कणकेसारखा गोळा तयार करावा. सुगंधासाठी त्यात कापूराचा चुरा अथवा अत्तर मिसळवू शकता. याच्या छोट्याछोट्या गोळ्या तयार करून चांगल्या वाळवून घ्याव्यात.

काय दक्षता घ्याल ?
१) विभूतीची गोळी (खडा) फार टणक अथवा ठिसूळ नसावा. 
२) तळहाताची आतील बाजू लोकांना दिसू नये. ३)बाहीतून सरकणारी वस्तू नेमकी तळहातातच यावी,यासाठी आधीच सराव करावा.

५ कोटी रुपयांचे बक्षीसे केव्हा मिळेल ?
असे चमत्कार फसवणूक मुक्त स्थितीत सिद्ध केल्यास, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती द्वारा गेल्या ३७ वर्षांपासून सतत आव्हाने दिल्या जात आहे,की कोणताही चमत्कार सिद्ध करा २५ लाख रुपये जिंका.सोबतच जगभरातून ५ कोटीहून अधिक रुपयाची बक्षिसे मिळवून देण्याची समिती जवाबदारी घेते.  मित्रांनो,अश्या प्रकारे हवेतून हात फिरवून विभूती,चैन इ वस्तू काढता येत नाही.नाहीतर अश्या बुवाबाबांनी हवेतून हात फिरवून उपासमारी थांबवण्यासाठी गहू तांदुळाचे पोते, रुग्ण वाचवण्यासाठी ऑक्सिजनचे सीलेंडर काढून दाखवावे म्हणावं.  हवेतून त्याच वस्तू काढता येतात ज्या आधी लपविल्या जाऊ शकतात. जादूटोणा विरोधी कायदा कलम २ नुसार चमत्काराचे प्रदर्शन करून लोकांना फसवणे, ठकवणे, दहशत बसविणे यातून आर्थिक प्राप्ती करणे हा गुन्हा असून सात वर्षा पर्यंतची शिक्षा मिळू शकते. अशा भोंदुंना संत ज्ञानेश्वरांनी योग याग विधी, येणे नव्हे सिद्धी।वायाची उपाधी,दंभधर्म।। असे सातशे वर्षांपूर्वी ठणकावून सांगितले ते आपण समजून घेऊया विवेकी बनुया

aaaa