भानामती

भानामती शब्द सर्वांनीच ऐकला असेल पण भानामती म्हणजे नेमकं काय हे सांगता येणं अनेकांना शक्य होत नाही कारण तशी या विषयाबद्दल समाजात जागृती नाही.  इंग्लिश मध्ये याला Poltergeist ( पोल्टेरजिस्ट) असे म्हणतात. गुजरात मध्ये मैली विद्या म्हणून भानामती ओळखली जाते.

भानामती म्हणजे नेमके काय ? हे आपण आधी समजून घेऊयात. एखाद्या व्यक्तिद्वारे एखादा विशिष्ट उद्देश साध्य करण्याकरिता कळत -नकळतपणे घरात किंवा गावात वेगवेगळ्या प्रकारच्या अमानवीय वाटाव्यात अशा घटना घडवून आणून त्याद्वारे दहशत निर्माण करणे म्हणजे भानामती म्हणता येईल.

एखादी अतृप्त आत्मा, सैतान-भूत हे घडवून आणते किंवा एखादा बुवा-बाबा-मांत्रिक आपल्या मंत्रशक्तीने भुतांना वश करून त्यांच्याकडून हे करवून घेतो असा सर्वसामान्य समज आहे.  हे आत्मे किंवा भूत आपल्या अतृप्त इच्छा याद्वारे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात किंवा त्रास देऊन बदला घेण्याचा प्रयत्न करतात असेही समजण्यात येते.  अनेक वर्षांपासून ज्या गोष्टी भानामती बद्दल ऐकण्यात येत आहेत अजूनही फक्त त्याच गोष्टी या भानामती मध्ये घडत असतात. कुठलेच काहीच नवीन प्रकार किंवा घटना बघण्यात येत नाही. आधीच्या पिढ्या नवीन पिढ्यांना ज्या गोष्टी भानामती बद्दल सांगत गेले नेमके तेच आणि तितकेच प्रकार भानामतीत आजही घडत आहेत.

भानामती करते या संशयावरून अनेक महिलांचा अमानुष छळ झालाय आणि अजूनही होतोय. कितीतरी महिलांचा तर बळी गेलाय याला कारणीभूत कोण?  तर भानामती वर उपाय सांगणारे बुवा-बाबा-मांत्रिक कारण तेच अमुक अमुक लुगडं घालणारी,जिच्या घरासमोर निंबाच झाड आहे तिनेच भानामती केलीय वगैरे सांगणार आणि आपला अंधश्रद्ध समाज जराही विचार न करता तिचे हाल हाल करून तिचा जीव घेणार.

काही ठिकाणी भानामती घडवून आणणारी व्यक्ती मानसिक रुग्ण असते. आपण काय करत आहोत हे तिला सुद्धा कळत नसते परंतु अशा प्रकरणाचे प्रमाण खूप कमी आहे. त्यात शारीरिक रोगांमध्ये शरीराचा जो भाग विकृत झालाय त्यावर बोट ठेऊ शकाल पण मानसिक रोगात अस होत नाही त्यामुळे अशी प्रकरणे अतिशय भारी जातात.  काही व्यक्ती मनाचे दौर्बल्य व समोर आलेल्या अडचणी लपविण्यासाठी, वास्तवास सामोरं जाण्याऐवजी अंधश्रध्येचा आधार घेतात.

भानामती ही कधीच कोणतीच दैवी किंवा शैतानी शक्ती, भूत पिशाच, मंत्रशक्ती, आत्मे घडवून आणत नाहीत. तुमच्या आमच्यासारखी हाडामासाची व्यक्तीच हे सर्व प्रकार घडवून आणते.  अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे 5 लाखाचे आव्हान आहे की तुम्ही एखादी अमानवीय शक्ती असे प्रकार घडवून आणते हे सिद्ध करून दाखवा आणि 5 लाखाचे बक्षीस मिळवा. 35 वर्षात आजपर्यंत कुणी माई का लाल भेटला नाही जो हे आव्हान स्वीकारेल. कारण या घटना मनुष्यच घडवून आणतो.

मग ह्या घटना कोणत्या तर घरातील कपडे पेट घेणे, कपडे फाटने, अन्नात विष्ठा येऊन पडणे,   घरातील भांडी स्थलांतरित होणे, शरीरावर फूल्या उमटणे, अंगावर जखमा होणे, घरावर दगड पडणे, घरातून पैसे नाहीसे होणे, अंगणात विविध वस्तू येऊन पडणे, डोळ्यातून हळदी कुंकू येऊन पडणे, तोंडातून सुया पडणे, सैतानाच्या-भुताच्या चिठया येणे, घरातील भिंतींवर संदेश लिहिल्या जाणे, घरातीलच साहित्याने -धान्याने एखादे नाव लिहिल्या जाणे किंवा काही चिन्ह बनविल्या जाणे,  मुली-स्त्रियांना उचलून खिडकीसारख्या कोनोड्यात नेऊन ठेवणे अशा एक ना अनेक प्रकारच्या घटना भानामती मध्ये घडत असतात.

वर दिलेल्या घटनांपैकी एकही नवीन घटना घडत नाही कारण अशा घटना घडविणारी व्यक्ती की त्याच घरातील किंवा गावातील असते आणि तिने भानामती मध्ये काय काय होते हे कुठून तरी ऐकलेलं असत आणि तसच करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. कारण अस झाल्याशिवाय भानामती घडतेय अस लोक समजणार नाहीत. ती भीती उत्पन्न होणार नाही व आपला उद्देश सफल होणार नाही.

आता ह्या घटना घडतात कशा ते बघुयात. एखादवेळी अपघातानेच एखादी घटना घडून जाते, आग लागते आणि लोक समजायला लागतात की भानामती घडतेय. जी व्यक्ती अशा घटना घडवते तिला आपण पोल्टेरजिस्ट किंवा एजंट म्हणूयात. ही एजंट व्यक्ती कधीच ह्या सर्व घटना पूर्वनियोजन-प्लॅन करून घडवून आणत नाही. सुरुवातीला तिचे अजिबात प्लॅनिंग नसते. जशी जशी संधी मिळेल तस तशी ती व्यक्ती अशा घटना घडवून आणून दहशत माजवण्याचा प्रयत्न करत असते.

या एजंट ला स्वतः चा उद्देश साध्य करायचा असतो. यामागे एजंट चे विविध उद्देश असू शकतात. जसे की एखादी व्यक्ती घरात नको असल्यास तिला बाहेर काढण्यासाठी, लैंगिक उपासमार होत असेल तर ती लैंगिक भूक भागविन्यासाठी, चोऱ्या करण्यासाठीं, प्रेमप्रकरणासाठी, घरकाम जास्त असेल तर त्यातून वाचण्यासाठी, कधी कधी इतरांचं लक्ष वेधून घेण्यासाठी गम्मत म्हणून सहज एखादी कृती कुणी करून जात आणि गावकरी त्याला भानामती च नाव देऊन मोकळे होतात.

अनेकदा गावात किंवा गावाशेजारी राहणारे पुजारी-मांत्रिक सुद्धा असे प्रकार घडवून आणू शकतात भुताटकी- आदिभौतिक शक्तीची दहशत माजवली की गावकऱ्यांना आपली गरज वाटेल व आपलं दुकान चालेल या उद्देशातून सुद्धा भानामती घडत असतात.

भानमतीचे प्रकारात वर्गीकरण करायचे झाल्यास 4 प्रकारे करता येईल एक म्हणजे

  • घरातील एजंट - ज्याच्या अंगावर, मांडीवर वक्षस्थळांवर फुल्या येतात जखमा होतात, तोंडातून सुया-डोळ्यातून हळद कुंकू पडत, अंगावरच कपडे फाटण किंवा अंगावरच कपडे पेट घेऊन पण इजा न होण म्हणजेच तोच व्यक्ती स्वतः एजंट असण्याची पुरेपूर शक्यता असते. 
  • अनामिक एजंट - हा सुद्धा घरातीलच व्यक्ती असतो परंतु घरातील भांडे स्थलांतरित होणे, घरात जेवणात विष्ठा येऊन पडणे, कपडे जळणे, सैतानाच्या चिठया येणे, धान्याने नाव किंवा चिन्ह काढल्या जाणे असे प्रकार घडत असल्यामुळे प्राथमिक तपासणीत नेमकं कोण व्यक्ती आहे हे सहज कळत नाही, शोधावं लागत.
  • बाहेरील एजंट -  हा सर्वात कठीण प्रकार समजल्या जातो कारण या प्रकारात घरावर दगड पडणे, अंगणात विविध वस्तू येऊन पडणे अस घडत असताना संपूर्ण गावातून ती व्यक्ती शोधावी लागणार असते. गावातील असंख्य लोकांपैकी ती कुणीही व्यक्ती असू शकते हे शोधणे अतिशय कठीण कार्य असत.
  • पुजारी-बाबा-मांत्रिक :- यामध्ये असे बुवा-मांत्रिक भूतयोनी हे घडवतय असा आभास निर्माण करून स्वतः च महत्व वाढवून घेतात व या दहशतीचा वापर करून आपली भौतिक व आर्थिक बाजू मजबूत करून घेतात.

भानामती बंद करण्यासाठी ज्याठिकाणी अशी घटना घडत आहे त्याची तपशीलवार माहिती घ्यावी लागते. ज्याच्या घरात हे प्रकार घडत आहेत त्या कुटुंबातील कुटुंबप्रमुखाकडून आमच्याकडील भानामती केस तपासायला या आम्ही पूर्ण सहकार्य करू अश्या आशयाचा समितीच्या नावाने एक लेखी विनंतीअर्ज लिहून घेऊन त्याखाली त्यांची स्वाक्षरी असली पाहिजे. कुटुंबातील जबाबदार व्यक्तीच्या लेखी विनंतीशिवाय अशा प्रकरणात समितीला काहीच करता येणार नाही. घरच्यांना घरचीच कुणी व्यक्ती हे करत असते अस न सांगता त्यांना विश्वासात घेऊन घरच्यांच्या मुलाकाती घेऊन , शोध घेऊन अशा घटना थांबवता येतात. अर्थात याकरिता अंधश्रद्धा निर्मूलन कार्याचा चांगला अनुभव असलेल्या व लोकांची मने जाणून घेऊ शकत असलेल्या व्यक्तीनेच भानामती बंद करण्याकरिता पुढाकार घ्यावा. आपल्या उतावीळ पणामुळे व पुरेशा ज्ञाना अभावी संपूर्ण विज्ञान जगताचा पराभव होऊ शकतो याचे पुरेपूर भान कार्यकर्त्यांस असले पाहिजे.अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने व प्रा.श्याम मानव सरांनी आजपर्यंत शेकडो भानमतीच्या केसेस बंद पाडल्या आहेत. अशा प्रकारच्या घटना कुठेही घडत असतील तर आपण त्या ठिकाणच्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करून अशा घटना 100% बंद करू शकता. 2013 साली महाराष्ट्र शासनाने पारित केलेल्या जादूटोणा विरोधी कायद्यानुसार अशा घटना घडविणाऱ्या व्यक्तीवर किंवा अमुक व्यक्तीने भानामती केली अस म्हणणाऱ्या व्यक्तीवर सुद्धा गुन्हे दाखल होतात.  तेव्हा स्वतः ला व पर्यायाने समाजाला या अंधश्रद्धेच्या गर्तेतून काढून वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजावा हाच प्रत्येक सुजाण नागरिकाचा प्रयत्न असला पाहिजे.


aaaa